Nashik farmer suicide : सिन्नर : नाशिकच्या सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कर्जाच्या जाचाला कंटाळून शेतकरी गोरख कचरू शिरसाठ यांनी आत्महत्या केली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेतकरी आत्महत्येच्या घटनेत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. शेतकरी आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी कर्ज काढतो. ते न फेडता आल्याने परिणामी काही शेतकरी आपली जीवनयात्रा संपवतात. अशीच एक दुर्दैवी घटना सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे घडली आहे.
गोरख शिरसाठ यांची पत्नी पोल्ट्रीवर चक्कर मारण्यासाठी गेल्या असता त्यांना गोरख यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. गोरख यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व दोन भाऊ असा परिवार आहे.
मृत गोरख यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीत बँकेच्या कर्जामुळे मी आत्महत्या करत आहे, असा उल्लेख त्यांनी केला आहे. चिठ्ठीत म्हटले आहे की, सिन्नर व्यापारी बँकेचे एक लाख रुपये देणे आहे. तसेच बहुउद्देशीय बँकेकडून दोन लाखांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे व्याज धरून अधिक रक्कमेची मागणी बँकेकडून सातत्याने होत होती. बँकेच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे.
जानेवारी 2023 ते ऑगस्ट 2023 दरम्यान नाशिक विभागात 200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात 104, अहमदनगरमध्ये 48, धुळ्यात ३६, नाशिकमध्ये 8 आणि नंदुरबारमध्ये 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.