नाशिक : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील प्राचार्यांच्या कार्यालयात घुसून विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकाने प्राचार्यांसह कर्मचारी व विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये महाविद्यालयातील कर्मचारी, विद्याथी व प्राचार्य जखमी झाले आहेत. उपनगर पोलीस ठाण्यात संशयित विद्यार्थ्यासह त्याच्या पालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय बोराडेसह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. महाविद्यालयात हा प्रकार घडल्याने शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन विद्यार्थ्यांचा वाद झाला असता तो सोडविण्यासाठी प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये जात होते. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. जखमी कर्मचारी नितीन कैलास देवडे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणाबाबत फिर्याद दिली आहे. उपनगर पोलीस ठाण्यात विद्यार्थी मयूर विजय बोराडे, त्याचे वडील विजय बोराडे तसेच एका अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राचार्यांच्या कॅबिनमध्ये वाद..
गुरुवारी (दि. २२) दुपारी १. ४५ वाजण्याच्या सुमारास नितीन देवडे बिटको महाविद्यालयात ड्युटीवर असताना महाविद्यालयातील वर्गाच्या दिशेने जोराचा ओरडण्याचा आवाज आला. देवडे तेथे गेले असता मयूर बोराडे व अभयसिंह चौहान यांच्यामध्ये भांडण झाल्याचे दिसून आले. देवडे दोघांना घेऊन प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी कार्यालयात वाद मिटवण्यासाठी घेऊन गेले. प्राचार्य यशस्वीपणे वाद मिटवत असताना मयूर बोराडेचे वडील विजय बोराडे व एक अनोळखी व्यक्ती यांनी प्राचार्य कार्यालयात घुसखोरी केल्याची माहिती मिळत आहे.
हल्लेखोरांकडून प्राचार्यांना मारहाण..
दमदाटी करत बेसबॉल स्टीक व लाकडी दांडक्यांनी देवडे व विद्यार्थी अभयसिंह चौहान यांना मारहाण करण्यात आली यामध्ये देवडे आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यावेळी चौहान हा बेशुध्द झाला. नंतर हल्लेखोरांनी प्राचार्य कुलकर्णी यांना मारहाण करत कार्यालयात तोडफोड केली. विजय बोराडे याने आपण मनसेचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले असता पदाधिकाऱ्यांनी मात्र बोराडेशी कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विजय बोराडे व अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.
प्राचार्यांनी काय सांगितले?
दरम्यान, याबाबत प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले कि, दोन विद्यार्थ्यांमध्ये दुपारी वाद झाला. तो मिटवण्यासाठी कर्मचारी दोघांना माझ्या कार्यालयात घेऊन आले असता मी समजावून सांगत असताना अचानक अनोळखी व्यक्तींनी माझ्या कार्यालयात घुसखोरी करून धुडगूस घातला व दांडक्याने मारहाण सुरू केली. त्यात एक कर्मचारी आणि विद्यार्थी गंभीर जखमी झाला. मलाही मार लागला. शैक्षणिक संस्थेत अशी गोष्ट घडणे अत्यंत निषेधार्थ आहे. ज्यांनी हे गैरकृत्य केले त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे.