नाशिक : शेअरट्रेडिंगच्या बहाण्याने शहरातील स्वाफ्टवेअर इंजिनिअरला सायबर भामट्यांनी तब्बल ३७ लाखाला गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. अल्पावधीच्या गुंतवणुकीवर जास्तीच्या मोबदल्याचे आमिष दाखवून हा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश प्रवीण मुंडेश्वर (रा. हिरावाडी, पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मुंडेश्वर यांच्यासोबत गेल्या मार्च महिन्यात ऑक्टोपस स्टॉक ए ८ या व्हॉटसग्रुपमधील अॅडमिन संशयित प्रो. रोहन कुलकर्णी व त्यांचे असिस्टंट राजेश पंडीत यांनी वेळोवेळी संपर्क साधून मुंडेश्वर यांचा विश्वास संपादन केला. मुंडेश्वर यांना आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेत त्यांना शेअर मार्के ट ट्रेडिंगमधील गुंतवणुकीतून मिळणाऱ्या लाभाचे प्रलोभन दाखविण्यात आले. या प्रलोभनासस बळी पडल्याने ही फसवणूक झाली.
मुंडेश्वर यांना विश्वासात घेण्यात आल्यानंतर त्यांनी १९ मार्च ते १५ मे २०२४ दरम्यान ३६ लाख ७० हजाराची गुंतवणूक केली. प्रारंभी भामट्यांनी काही मोबदला अदा करीत अभासी रक्कम जमा असल्याचे दर्शवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. ही गुंतवणूक बोगस ट्रेंडिग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे निदर्शनास येताच मुंडेश्वर यांनी संबधितांशी संपर्क साधला. मात्र सपंर्क न झाल्याने त्यांनी पोलीसात धाव घेत घडलेला प्रकार सायबर पोलिसांना सांगत फिर्याद दिली. त्यानुसार सायबर पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.