मालेगाव : नाशिक जिल्ह्यामधुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगा हवा म्हणून अनेक महिला व्रत उपास, नवस करत असतात. परंतु, एका दगडाचे काळीज असणाऱ्या आईने मात्र नुकतंच जन्माला आलेल्या पुरुष जातीच्या अर्भकाला काटेरी झुडुपात फेकून पळ काढला असल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील मालेगावच्या कळवाडी भागात हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्भकाला झुडुपात मरण्यासाठी फेकुन देण्यात आलं आहे. आईच स्वतः आपल्या त्या अर्भकाच्या जीवावर उठली. त्या महिलेनं मूल नको असल्याने त्याला झुडुपात टाकून पळ काढला आहे. रस्त्याने जाणाऱ्या एका दाम्पत्याला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेनं जात झुडुपात पाहिलं आणि धक्काच बसला.
या दाम्पत्याने चिमुकल्याचा जीव वाचवला. त्याला काटेरी झुडुपातून बाहेर काढलं आणि स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. काही दिवसांपूर्वी जन्म घेतलेले हे पुरुष जातींचे अर्भक आहे. भुकेने व्याकुळ झालेला हे बाळ रडत असताना रस्त्याने जाणाऱ्या एका दांम्पत्याला त्याच्या रडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिलं. तेव्हा हा प्रकार उघड झाला.