अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिसगाव तालुक्यात वयोवृद्ध व्यक्तीला चोरट्याने डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. मच्छिंद्र तुकाराम ससाणे (वय-८५) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी ( दि. ०६) रात्री पावणे एकच्या सुमारास तिसगाव येथील वृद्धेश्वर हायस्कूल ते शिरापूर रस्त्यालगत भडके वस्तीवर घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भडके वस्तीवर राहणाऱ्या मच्छिंद्र ससाणे यांच्या घरावर चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी ससाणे यांच्या चार ते पाच कोंबड्या चोरी केल्या, तसेच लघुशंकेला उठलेल्या मच्छिंद्र ससाणे यांना जबर मारहाण करून डोक्यात धारधार शस्त्राने वार केले. यामध्ये ससाणे यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, मच्छिंद्र ससाणे व त्यांची पत्नी एका ठिकाणी राहत असून, बाजूला त्यांचे दोन मुले राहतात. या घटनेपूर्वी आजूबाजूच्या वस्तीवरील घरांचे दरवाजे चोरट्यांनी बाहेरून बंद करून ठेवले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक त्यांच्या मदतीला येवू शकले नाहीत.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी घटनास्थळी भेट दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी तांबे, पोलिस उपनिरीक्षक विलास जाधव, निवृत्ती आगरकर उपस्थित होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.