जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे स्वगृही म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये परत येणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगलेच गरम केले आहे. या पार्श्वभूमीवर आता आमदार एकनाथ खडसे यांनी स्वतः भाजपमधील प्रवेशाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देताना या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.
काही वैयक्तिक कामांसाठी मी दिल्लीला गेलो होतो, सध्या माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खडसे म्हणाले की, असा काही निर्णय व्हायचा असेल, तर तो फार विचारपूर्वक घ्यायचा असतो. कार्यकर्त्यांशी, पक्षाशी आणि नेत्यांशी बोलून घ्यायचा असतो. कारण हा अतिशय महत्त्वाचा निर्णय असतो. ज्यावेळी असा निर्णय घ्यायचा असेल, त्यावेळी आपण स्वतःहून माध्यमांना माहिती देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, सध्या तरी अशा कोणत्याही हालचाली नसल्याचे एकनाथ खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
पुणे बोलताना खडसे यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये गेल्यानंतर अनेक नेत्यांशी भेटीगाठी होत असतात. मात्र, मंगळवारी अशा कोणत्याही भेटीगाठी झाल्या नाहीत. भाजपमध्ये पुन्हा येण्यासाठी खडसे प्रयत्नशील असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होते. त्यावर आता खडसे यांनी त्याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की मला, भाजपमध्ये परत जाण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. भाजपमध्ये वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत माझे संबंध उत्तम असून आताही ते चांगले आहेत. त्यामुळे मला भाजपमध्ये जायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही, असं देखील खडसे म्हणाले.