जळगाव: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत असणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला तीन ते चार जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जोरदार टोला लगावला आहे.
राज्यातील महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. या पार्श्वभूमीवर आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील जागावाटपाचा तिढा आज सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबबत बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, शरद पवार यांच्यासोबत असताना अजित पवार यांना जी सन्मानाची वागणूक होती. तो सन्मान आता अजित पवार यांनी गमावला आहे. आज अजित पवार यांच्याकडे 50 हून अधिक आमदार आहेत. 50 आमदार आणि स्वतः उपमुख्यमंत्री असतानाही त्यांना त्यांच्या बायकोसहित तीन जागांवर समाधान मानावे लागत आहे. हे चित्र बरोबर नाही, असा टोला आमदार एकनाथ खडसेंनी अजित पवारांना लगावला आहे.