नाशिक : शेअर मार्केटमधील आर्थिक लाभाचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील अनेकांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात तब्बल ८० लाखांची फसवणूक करण्यात आल्याचे पुढे आले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादरासह अन्य गुंतवणूकदारांशी भामट्यांनी गेल्या वर्षी संपर्क साधला होता. वेगवेगळ्या कंपनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेत भामट्यांनी शेअर बाजाराबाबत गुंतवणूकदारांना माहिती देऊन आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवत, बनावट स्थापन केलेल्या कंपनीच्या प्लॅटफार्मवर खाते उघडण्यास भाग पाडले.
या ॲपवरील विविध कंपन्यांच्या सुरुवातीच्या आणि अन्य शेअरमध्ये खरेदी केली असता, ही फसवणूक झाली. गुंतवणूकदारानी विविध बँक व वॉलेट खात्यातून ऑनलाइन लाखोंची रोकड भरली असून, या प्रकरणात तब्बल ७८ लाख ७८ हजार ६०० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख तपास करीत आहेत.