धुळे : संपूर्ण महाराष्ट्रात गणेश विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच धुळ्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मिरवणुकीदरम्यान दारू प्यायलेल्या ट्रॅक्टर चालकाने तीन मुलांना चिरडले आहे. या घटनेत तीन चिमुरड्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे.
गणपती मिरवणुकी दरम्यान ही घटना घडली आहे. धुळ्या जवळच्या चित्तोड गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये परी शांताराम बागुल (वय-१३), शेरा बापू सोनवणे (वय-६), लड्डू पावरा (वय-३), या बालकांचा समावेश आहे. या घटनेनंतर चिमुरड्यांच्या कुटुंबियांनी काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, धुळे तालुक्यातील चितोड गावात एकलव्य मित्र मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टरखाली आल्याने तीन बालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांमध्ये एक मुलगी आणि दोन मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे धुळ्यात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंदीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. धुळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.