नाशिक: ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. अटकेनंतर आजच त्याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या बाबी आज उघडकीस येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ललित पाटील याच्या आईने आणि वडिलांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला आहे.
ललित पाटीलची आई म्हणाली की, माझ्या मुलाचे एन्काऊंटर करू नका, त्याच्यामागे २ मुले आणि आई वडील आहेत. मला त्याचा एन्काऊंटर होईल अशी भीती सतावत आहे. पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली. या दरम्यान ललित सापडला तर त्याचा एन्काऊंटर करू अशी धमकी पोलिसांनी दिली होती. त्यामुळे मला खूप भीती वाटते. ललितला फसवले आहे. जी शिक्षा असेल ती त्याने भोगावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“ललितला फसवलंय हे त्याने सांगावं. जे शिक्षा होईल त्याला त्यानी सामोरं जावं. तो फसला गेलाय, त्यामुळे तोही घाबरून असेल. आता मुंबई पोलिसांनी त्याला पकडलंय, त्यामुळे त्याने सांगावं की त्याला फसवलं गेलंय. पैशांसाठी त्याला टॉर्चर केलं गेलं. म्हणूनच त्याने पलायन केलं. ललितचे हर्नियाचं ऑपरेशन होणार होतं. त्याला चेकअपला घेऊन गेले असता डॉक्टर म्हणाले की, आज ऑपरेशन केलं आणि उद्या तुला नेलं तर तू जगू शकणार नाही. म्हणून तो घाबरून तिथून निघून गेला”, असं त्या म्हणाल्या.
“आम्ही ललितला जन्म दिला, हा आमचा गुन्हा आहे का? आम्ही काय केलंय ? आई-बापांनी जन्म दिला हा गुन्हा नाहीय ना. मी खूप टेन्शनमध्ये आहे. पोलीस येथे येऊन आम्हाला नाहक त्रास देत आहेत. लहान लहान नातू आहेत, त्यांना ते म्हणतात तुमची जिंदगी बरबाद झाली. असं म्हणायची काय गरज आहे का?”, असा प्रश्न ललितच्या वडिलांनी केला आहे.