धुळे : धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याने जिल्हा हादरला. एकाच कुटुंबातील आई-वडिल आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. गिरासे कुटुंबाने इतक्या टोकाचे पाऊल उचलल्याने धुळ्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र गिरासे कुटुंबीयांच्या नातेवाइकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे आणि सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणा-या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
नेमकं काय घडलं…?
प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान आहे. सोमवारी (दि. 16) रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध घेऊन ते घरी गेले होते. यानंतर कॉलनी व परिसरात चौघे जण आढळून आले नाहीत. तसेच प्रवीण गिरासे यांनी आपल्या शेजाऱ्यांना मंगळवारी आपण मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गिरासे कुटुंबीय कोणाच्याही दृष्टीस पडले नव्हते. प्रवीण गिरासे यांच्या घरासमोरच त्यांची बहीण मनीषा गिरासे यांचे घरदेखील आहे. दादा, वहिनी किंवा भाचे दिसत नसल्याने बहिणीने मोबाईलद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रिंग जात होती. परंतु कोणाकडून प्रतिसाद मिळत नव्हता.
अखेर बहीणीने गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास भावाकडे गेली. भावाच्या घरातून तिला दुर्गंधी येत होती. बंद असलेला दरवाजा उघडला असता पहिल्या मजल्यावर भाऊ प्रवीण गिरासे याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले. तर बेडरूममध्ये भावजय दीपांजली गिरासे, भाचा नितेश आणि सोहम हे सर्व मृतावस्थेत आढळून आले.
पोलिसांना सापडली सुसाईड नोट…
पोलिसांनी गिरासे यांच्या घराची झडती घेतली तेव्हा प्रवीण गिरासे यांच्या मृतदेहाच्या बाजूला पोलिसांनी एक सुसाईड नोट आढळून आली. यात आम्ही सर्वजण आत्महत्या करीत असून आमच्या आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही, असे त्यात नमूद केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, ही सुसाईड नोट पाहिल्यानंतर नातेवाईकांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
नातेवाईक म्हणतात घातपात झाला आहे…
प्रवीण गिरासे व त्यांची पत्नी दीपांजली गिरासे हे मनमिळावू स्वभावाचे होते. प्रवीण गिरासे यांचे लामकानी, तसेच धुळे शहरात खते बि-बियाणे विक्रीचे दुकान आहे. तसेच नितेश व सोहम दोन्ही मुलेदेखील हुशार होते. नितेश हा नुकताच बारावी उत्तीर्ण झाला होता. मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. तर सोहम अकरावीला होता. तर दीपा गिरासे या महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयात शिक्षिका होत्या. धुळे शहरात गिरासे हे प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांचे कुटुंब आत्महत्या करूच शकत नाही. त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.