धुळे : धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील आई-वडिल आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. मात्र या कुटुंबाने टोकाचं पाऊल का उचललं, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. धुळे शहरातील समर्थ कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने जिल्हा हादरुन गेला आहे.
प्रवीण मानसिंग गिरासे, गीता प्रवीण गिरासे आणि मुलं मितेश प्रवीण गिरासे आणि सोहम प्रवीण गिरासे असे आत्महत्या करणा-या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान आहे. प्रवीण गिरासे हे पत्नी आणि दोन मुलांसमवेत प्रमोद नगर येथे वास्तव्यास होते. मंगळवारी (दि.17 सप्टेंबर रोजी) मुलाच्या ॲडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते. मात्र, मंगळवारपासून घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसत होते. प्रवीण गिरासे यांची बहीण गुरुवारी सकाळी त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा वरच्यावर लावण्यात आला होता. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना समोर आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा प्रकार समजल्यानंतर घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. पोलीस कुटुंबाच्या नातेवाईकांकडे चौकशी करत आहे.