धुळे : धुळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. धुळे तालुक्यातील निमखेडी गावात सात वर्षीय चिमुकलीच्या घशात पेनाचे टोपण अडकल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अर्चना युवराज खैरनार (वय 7) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी येथील जिल्हा परिषद शाळेत अर्चना खैरनार इयत्ता पहिलीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी अर्चना अभ्यास करत बसली होती. त्यावेळी अभ्यास करत असताना तिने पेनाचं टोपण तोंडात धरलं होतं. अचानक ते टोपण तिच्या घशात अडकलं, त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. शिक्षकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पाठीवर मारून टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण हा प्रयत्न असफल ठरला. तात्काळ अर्चनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.