जळगाव : लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपण निर्णय घेतला तर कुणाच्या पोटात दुखायला लागलं. कुणी म्हणालं लाच देताय का, कुणी म्हणालं मतं खरेदी करताय. अरे नालायकांनो, कुणीही बहिणीचं प्रेम विकत घेऊ शकत नाही. प्रसंगी त्या उपाशी राहतील मात्र भावाला जेऊ घालतील. कुणी म्हणालं की १५०० रुपये माघारी घेऊ. अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. जळगावमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महिलांना सक्षम करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येत्या काळात महिला सक्षम झाल्यानंतर महाराष्ट्र कधीच मागे पडणार नाही. मुख्यमंत्री आपण योग्य निर्णय घेतला, कारण आमच्या महिला बचत गटाचा एक एक पैसा परत करतात. ३१ ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरलेल्या महिलांना जुलै, ऑगस्ट महिन्यांचे पैसे आम्ही देऊ, असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. ही योजना फक्त निवडणुकीपुरती असल्याची टीकाही केली जात आहे. असं असताना महायुतीमधील आमदार रवी राणा आणि शिंदेंचे आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत, या योजनेचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असं सांगितलं आहे.
मतं जर दिली नाही तर पैसे परत घेतले जातील
मतं जर दिली नाहीत, तर पैसे परत घेतले जातील असं महायुतीतील असलेले आमदार रवी राणा यांनी गंमतीने म्हटलं होतं. तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी डिसेंबरनंतर या योजनेतून विरोधकांची नवे काढून टाकली जातील असं विधान केलं होतं. त्यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.