नाशिक : हद्दपारीची कारवाई केलेली असताना पूर्वपरवानगी न घेता शहरात फिरणाऱ्या दोघा तडिपारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. वेगवेगळ्या भागात दोघे मिळून आले असून, याप्रकरणी भद्रकाली व नाशिकरोड पोलीस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विक्की शांताराम जावरे (वय २१, रा. भीमशक्तीनगर, आगर टाकळी) व हितेश सुभाष डोईफोडे (वय २५, रा. साने गुरुजीनगर, जेल रोड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. वेगवेगळ्या भागात राहणारे जावरे व डोईफोडे यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यांच्या विरोधात अनुक्रमे एक व दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिल्ह्यातून दोघांना तडीपार करण्यात आलेले असताना ते शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.१६) दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
जावरे द्वारका परिसरात, तर डोईफोडे जेलरोड येथील महाजन हॉस्पिटल परिसरात मिळून आला. ही कारवाई मुंबई नाका पोलीस आणि शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने केली. याप्रकरणी भद्रकालीचे अंमलदार गुरू गांगुर्डे व युनिट दोनचे कर्मचारी सोमनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.