नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व समता परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यावर नाशिक शहर पोलीस परिमंडळ दोन उप आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आलेली तडीपारीची कारवाई अखेर रद्द करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात संबधित पदाधिकाऱ्याने विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी कारवाई रद्द करण्याचे आदेश दिल्याने पोलिसांवर संबंधित पदाधिकाऱ्यावरील तडीपारीची कारवाई रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.
समता परिषदेचे विभाग अध्यक्ष अमोल नाईक यांच्याविरोधात नाशिक शहर पोलीस परिमंडळ दोन उपायुक्त कार्यालयाने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार तडीपारीची कारवाई केली होती. अमोल नाईक यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सिडकोतील पेठे शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी शंभर मीटरच्या आतमध्ये असताना मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करा, असे सांगत असल्याने त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुह्याच्या आधारे नाईक यांना तडीपारीची नोटीस दिली असताना त्यांनी या नोटीसविरोधात विभागीय आयुक्तांकडे दाद मागितली होती. याप्रकरणात नाईक यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास करून विभागीय आयुक्तांनी पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांना अमोल नाईक यांची तडीपारी रद्द करण्याचे आदेश दिले आहे.