कोपरगाव : महाराष्ट्राला हादरावून टाकणारी घटना अहमदनगर जिल्ह्यातून समोर आली आहे. शाळेत उशिरा आलेच्या कारणावरून विद्यार्थिनीला शिक्षकाने मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली होती. दरम्यान, उपचार सुरु असताना विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या पालकांनी केला आहे. कु. तृप्ती दीपक भोसले (वय-९, रा. पढेगाव) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर ४ जुलै रोजी कोपरगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मुलीच्या आई उमा दीपक भोसले (वय-३५) हिने कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून शिक्षक सुनील दिगंबर हांडे (वय-४५, रा. निवारा, कोपरगाव शहर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील चारी नंबर ४५ जवळ असलेल्या शाळेत आमची मुलगी शिक्षण घेत होती. तृप्ती १ एप्रिल २०१८ रोजी शाळेमध्ये उशिरा गेल्याने शिक्षक सुनील हांडे यांनी तृप्तीला वर्गाबाहेर उभं करून तिच्या छातीत जोराचा धक्का दिला. ती पायऱ्यांवरून खाली घसरून पडली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे तिला उपचासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान तृप्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर तिच्या पालकांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तसंच शिक्षकांनी केलेल्या मारहाणीमुळेच मुलीचा मृत्यू झाल्या असल्याचा तक्रारी अर्ज मुलीच्या आईने न्यायालयात दाखल केला होता. त्यावरून माननीय न्यायालयाने सदर अर्जावर शिक्षकाविरुद्ध ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सी. आर. पी. सी. १५६ प्रमाणे तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश केले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहे.