नाशिक : कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविणार अशी घोषणा करून उमेदवारीसाठी सर्वपक्षीयांसाठी पर्याय खुले ठेवणाऱ्या माजी महापौर दशरथ पाटील यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपण लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच तयारी सुरू केल्याचे त्यांनी जाहीरही केले आहे.
नाशिकचे माजी महापौर अशी ओळख असलेल्या दशरथ पाटील यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. दशरथ पाटील हे 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले आहे. मध्यंतरीच्या काळात त्यांनी नशिब आजमाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्वच राजकीय पक्षांमध्ये फूट पडल्याचे पाहून त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जानेवारी महिन्यात त्यांनी ठाकरे गटाकडून लढविण्याचा प्रस्ताव सादर केला. परंतु पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर भाजपाकडेही काही मध्यस्थांमार्फत उमेदवारीची चाचपणी केली. त्यातही त्यांना यश आले नाही. नंतर त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केला होता. मात्र, आता त्यांनी माघार घेतली आहे.