जळगाव : टिळकनगर पोलीस ठाण्यातून सब इन्सपेक्टर विनायक बाबर बोलतोय, तुमच्या आधार कार्डचा गैरवापर झाला आहे. तुमच्या विरुद्ध ईडी कार्यालयात तक्रार नोंद असून तुमचे अटक वारंट निघाले आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी तत्काळ रक्कम भरणा करा, असे सांगत सायबर ठगांनी भुसावळ येथील अभियंत्याला १५ लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ येथील अभियंत्याला बुधवारी (दि. २६) एक फोन आला. बीएसएनएल कार्यालयातून बोलत असून तुमचा फोन दोन तासांनी बंद करण्यात येईल, असे समोरून सांगण्यात आले. तक्रारदाराने कारण विचारताच संशयित म्हणाला, तुमच्या मोबाइल क्रमांकावरुन गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात तुमच्याबद्दल लीगल अॅडव्हरस्टींग गेमबीलींग मुंबई येथे तक्रार दाखल आहे. त्यानंतर तुमचा कॉल पोलीस स्टेशनला ट्रॉन्सपर करतो म्हणत संशयिताने कॉल बंद केला. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअपवर कॉल आला आणि समोरील व्यक्तीने आपण विनायक बाबर, सब पोलीस इन्स्पेक्टर, टिळकनगर पोलीस ठाणे येथून बोलत असून तुमच्याविषयी आमच्याकडे तक्रार दाखल असून त्यांनी आधारकार्डची मागणी केली. पोलीस अधिकाऱ्याचा फोन असल्याचे समजून तक्रारदाराने विश्वास ठेवत त्यांचे आधार कार्ड व्हॉटसअॅपने पाठविले. तक्रारदार यांनी हा प्रकार त्यांच्या परिवार व मित्रांना सांगिलते असता तुमची कोणीतरी फसवणूक करत आहे, अशी भीती व्यक्त केली. त्यानंतर तक्रारदार यांनी गुरुवारी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.