Crime News: अहिल्यानगर : अहिल्यानगर शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर (Abhishek Kalamkar) यांच्यावर एका 22 वर्षीय तरुणीने गंभीर आरोप केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नोकरीचे आमिष दाखवून अभिषेक कळमकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन, अत्याचार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची लेखी तक्रार या पीडित तरुणीने पोलिसांकडे दिली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, एका बड्या राजकीय नेत्यावर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत असून, पीडितेच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर तपास आणि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, शाळेत नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत आरोपीने संबंधित तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर अहिल्यानगर शहरातील काही ठिकाणी तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची चर्चा असून त्यामुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिने विरोध केला असता आरोपीने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही बाब कुणाला सांगितल्यास परिणाम भोगावे लागतील, असेही सांगितल्याचा आरोप आहे. राजकीय दबाव आणि भीतीमुळे तिने आतापर्यंत तक्रार केली नव्हती. मात्र अन्य एका महिलेलाही अशाच प्रकाराचा अनुभव आल्याची माहिती मिळाल्यानंतर तिने पुढे येत पोलिसांत तक्रार दाखल केली.

हा गुन्हा सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. पुढील तपासासाठी प्रकरण तोफखाना पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी 2 विशेष पथके तयार केली असून तपास सुरू आहे.






