नाशिक : कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम मिळवून देण्यासह खरेदीखत रद्द करण्याच्या दाव्यात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या दिवाणी न्यायालयाच्या सहाय्यक अधीक्षकास लाचलुचपत प्रतिबंध विभागाने बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज उशीरार्यंत सुरू होते. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज दत्तात्रेय मंडाले असे संशयित लाचखोराचे नाव असून तो वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत आहे. तक्रारदार यांना त्यांच्या आईच्या संमतीशिवाय शेतीचे केलेले खरेदीखत रद्द करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करायचा असल्यानने त्यांनी संशयित सहाय्यक अधीक्षकाची भेट घेतली.
यावेळी न्यायालयीन कामकाजासाठी भरण्यात येणाऱ्या कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासह सदर प्रकरणात सहकार्य करण्याच्या मोबदल्यात संशयिताने लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधल्याने ही कारवाई करण्यात आली. एसीबीच्या पडताळणीअती गुरुवारी (दि.९) सापळा लावण्यात आला असताना संशयित एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला. न्यायालय आवारात तक्रारदाराने पुन्हा संशयिताची भेट घेतली असता, त्याने लाचेची मागणी करून ती स्विकारली. यावेळी त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर व अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मिरा आदमाने, हवालदार पंकज पळशीकर व पोलीस नाईक प्रमोद चव्हाणके आदींच्या पथकाने केली.