म्हसरूळ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (दि. २) कोंथिबिरीला शेकडा ४५ हजार रुपये दर मिळाला. शिंदे (ता. नाशिक) येथील भिका ठोंबरे यांनी कोथिंबिरीच्या ३३ जुड्या विक्रीसाठी आणल्या होत्या. त्या कोथिंबिरीने त्यांना हा विक्रमी भाव मिळवून दिला. गत आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे सोमवारी पार पडलेल्या लिलावात गावठी कोथिंबिरीच्या जुड्यांना किमान १० हजार व कमाल ४५ हजार रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. नाशिक कृउबा समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत.
बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल मुंबई, अहमदाबादकडे पाठविला जातो आणि काही प्रमाणात माल स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करत असतात. सद्यःस्थितीत पालेभाज्यांची आवक घटल्यामुळे बाजारभाव वधारले आहेत. बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर १०० ते ४५०, चायना कोथिंबीर ११० ते ४१० रुपये, मेथी २० ते २४०, शेपू २० ते ४८, कांदापात१५ ते ४५ रुपये असे प्रतिजुडी भाव होते. तर किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापातची जुडी छोटी करून दुप्पट भावाने विक्री होत आहे.