म्हसरूळ (नाशिक): गेल्या दोन-तीन दिवसांच्या पावसामुळे पालेभाज्याची आवक घटली असून नाशिक कृषी उत्पन्ना बाजारपेठेत शुक्रवारी (दि.६) रोजी केवळ १० ते १५ टक्के पालेभाज्यांची आवक झाली. त्यामुळे पालेभाज्यांचे भाव वधारले असून शुक्रवारच्या लिलावात चायना कोथिंबीरला किमान सात हजार रुपये तर सर्वाधिक ३९ हजार रुपये प्रति शेकडा भाव मिळाला. तर गावठी कोथिंबीरला किमान ८ हजार रुपये तर सर्वाधिक ३३ हजार रुपये प्रतिशेकडा बाजारभाव मिळाला.
नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीत सद्यःस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. काही प्रमाणात हा स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करतात. मात्र पालेभाज्यांची आवक सद्य स्थितीत घटली आहे.
यामुळे बाजारभाव वधारले असून शुक्रवारी सायंकाळी झालेल्या लिलावात गावठी कोथिंबीर किमान ८० ते सर्वाधिक ३३० रूपये जुडी, तर चायना कोथिंबीर किमान ७० रुपये जुडी तर सर्वाधिक ३९० रुपये जुडी दराने विकली गेली. त्याचप्रमाणे मेथी किमान २५ रुपये, तर सर्वाधिक ६९ रुपये, शेपू किमान २० तर सर्वाधिक ३९ रुपये जूडी, कांदापात किमान १७ तर सर्वाधिक ३८ रुपये जूडीला भाव मिळाला आहे.