अहमदनगर : भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या आवारातच पोलिस कर्मचाऱ्यानी विषारी औषध प्रश्न करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. प्रवीण जगताप असं आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि. १०) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
जगताप यांनी अचानक विष प्राशान केल्याने पोलिस ठाण्यात काही काळ गोंधळ निर्माण झाला. इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ जगताप यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जगताप हे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नियुक्तीस आहेत. शनिवारी नाईट ड्युटी असल्याने ते ठाण्यात आले होते. ड्युटीवर असतानाच त्यांनी अचानक विषारी औषध सेवन केले. ही बाब उपस्थित सहकारी कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी जगताप यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी रूग्णालयात धाव घेतली. जगताप यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. आर्थिक व्यवहारातून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यासंदर्भात कॅम्प पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.