अहमदनगर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड व वृक्ष लागवड कार्यक्रमास शासनाने मंजुरी दिली आहे. त्या अंतर्गत बांबू लागवडीचा विशेष कार्यक्रम राज्याच्या नियोजन विभागाच्या रोजगार हमी योजना प्रभागाने हाती घेतला आहे. या बांबू लागवडीतून जलसाठ्यांचे संवर्धन, संरक्षण व ग्रामपंचायती व वैयक्तिक लाभार्थींना वार्षिक उत्पन्नाचे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. अशी माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात पुढील तीन वर्षात 1200 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे त्यापैकी दरवर्षी 400 हेक्टर क्षेत्रावर याप्रमाणे सन 2024-25, 2025-26 व 2026-27 या आर्थिक वर्षात बांबू लागवड करण्याचे नियोजन केले आहे. असेही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले आहे.
यामध्ये वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग प्रत्येकी दरवर्षी 100 हेक्टर व जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग दरवर्षी 150 हेक्टर आणि कृषी विभागिय मार्फत दरवर्षी 50 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवडीचे नियोजन करणार आहे. त्यासाठी सार्वजनिक जागेची निवड, लाभार्थी निवड, बांबू रोपांची उपलब्धता व अन्य नियोजन याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचा सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्याचे रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षण सुवर्णा माने, विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण सचिन कंद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन दंडगव्हाळ, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे व वरिष्ठ भू-वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण यंत्रणा शकाटकर, जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक व उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप सोनकुसळे व रोहयो उपजिल्हाधिकारी रामदास जगताप उपस्थित होते.