नाशिक : सहकार खात्यामध्ये सहकार अधिकारी श्रेणी एक मधून सहाय्यक निबंधक पदासाठी पात्र उमेदवारांची माहिती शासनाने मागविली होती. चार कर्मचाऱ्यांची माहिती संशयास्पद दिल्याचे समोर आले आहे. यामुळे सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक पदाच्या पदोन्नत्या रखडल्या आहेत. विभागीय सहनिबंधक संभाजीराव निकम यांनी याबाबत चौकशी सुरू केली आहे.
नाशिक विभागीय सहनिबंधक कार्यालयातील तत्कालीन विभागीय सहनिबंधक व आस्थापना विभागाचे वरिष्ठ लिपिक यांनी शासनास भाऊसाहेब महाले, राजेंद्र वीरकर, अनिल रामसिंग पाटील, इब्राहिम तडवी आदी कर्मचाऱ्यांची माहिती पुरवली आहे. या कर्मचाऱ्यांनी शासनाच्या सन २०२१ च्या परिपत्रकाप्रमाणे या आधीच आरक्षणाचा लाभ घेतलेला असताना त्यांच्याबाबत आरक्षणाचा लाभ घेतलेला नसल्याची माहिती पुरविली. माहिती अधिकार कार्यकर्ते पंढरीनाथ काळे यानी माहिती अधिकारात याबाबतची माहिती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
काळे यांनी सहकार विभागातील पदोन्नतीसाठी अपात्र असलेल्यांना पात्र करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गेल्या २३ ऑगस्ट रोजी कळविले आहे. हे प्रकरण त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नाशिक येथील कार्यालयात चौकशीसाठी वर्ग करण्यात आले. त्यानंतर सहनिबंधक निकम यांना निवेदन देत या संशयास्पद पदोन्नत्या थांबवाव्यात, अशी मागणी यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस तसेच राज्याचे मुख्य सचिव यांनाही निवेदन पाठविले आहे, या तक्रारीनंतर काही कर्मचाऱ्यांनीही सहनिबंधक निकम यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.