नाशिक: मी कुठलीही मुलाखत दिलेली नाही किंवा मी कुठलेही पुस्तक लिहिलेले नाही. मला तुरुंगात जाण्याची कुठलीही भीती नाही. संबंधित बातमीत जे काही प्रसिद्ध झाले, तसे मी काहीही बोललेलो नाही. यासंदर्भात वकिलांशी चर्चा करून कार्यवाही केली जाईल, असे अन्न, नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
एका पुस्तकातील कथित संदर्भातील वृत्ताचे खंडन करत भुजबळ यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत स्पष्ट केली. ते म्हणाले, महाराष्ट्राचे हित आणि विकासासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार माझ्यासह एकत्र आले. सर्वांनी पक्षप्रमुख अजित पवार यांना पत्र दिले. त्यानंतर आम्ही महायुतीमध्ये सहभागी झालो.
परिणामी, आज राज्यात कोट्यवधींची विकासकामे सुरू असल्याचा दावाही भुजबळ यांनी केला. महाराष्ट्र सदन प्रकरणात न्यायालयाने मला क्लीन चिट दिलेली आहे. तेसुद्धा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मी मंत्रिमंडळात होतो, त्या वेळीच न्यायालयाचा निकाल आलेला आहे. त्यामुळे शंका घेण्याची किंवा संभ्रम होण्याची काहीही गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.