नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गेल्या दोन ते अडीच वर्षात राज्यानं अभूतपूर्व सत्तासंघर्ष अनुभवला आहे. राज्यातील दोन मोठे पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आणि राज्यातील राजकारणात भूकंप झाला. अशातच पक्षांतर्गत फुटीनंतरची यंदाची पहिलीच विधानसभा निवडणूक असल्यामुळे मोठी रंगत बघायला मिळत आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ मोठा धक्का देऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत.
मंत्री छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांनी यापूर्वीच शड्डू ठोकला असून विधानसभेसाठी ते इच्छुक असल्याचं जाहीरही केलं आहे. त्यामुळे महायुतीकडून संधी मिळण्याची चिन्ह न दिसल्यामुळे आता माजी खासदार समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे.
नांदगाववरुन महायुतीत मिठाचा खडा?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदगावच्या राजकीय वर्तुळासोबतच महायुतीतही खळबळ माजली असल्याचे सद्याचे चित्र आहे. समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी सध्या ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदे गट भुजबळांसाठी जागा सोडणार? की, समीर भुजबळ अपक्ष लढणार किंवा महाविकास आघाडीचा रस्ता पकडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘हे’ नेते समीर भुजबळांच्या संपर्कात..
समीर भुजबळ सध्या महायुतीकडून उमेदवारी मिळेल या प्रतीक्षेत आहेत. सध्या सुहास कांदे हे महायुतीचे उमेदवार असतील अशी सद्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र, समीर भुजबळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारी न मिळाल्यास भुजबळ इतर पर्यायांचा विचार करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या अपक्ष किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढता येईल का? याची सुद्धा चाचपणी भुजबळ यांच्याकडून केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे ठाकरे गट आणि शरद पवार गटाचे नेतेही समीर भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे.