नाशिक : महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार) नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार अशी चर्चा असतानाच त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आले आहे.
पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळांनी प्रसारमाध्यमांसमोर बोलताना कमी शब्दात आगामी काळातील आपल्या राजकारणाची दिशा बोलून दाखवली आहे. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले, मंत्रिमंडळातून मला का काढले याबाबत मला माहिती नाही. मात्र, सात-आठ दिवसांपूर्वी माझे वरिष्ठांशी बोलणे झाले होते. त्यावेळी ते मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचे असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचे होते तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितले की, विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही. तुम्ही लढत असाल तर पक्षाला जोम येईल. पक्ष व कार्यकर्ते राज्यभर जोमाने काम करतील. त्यामुळे तुम्ही लढलेच पाहिजे, असे मला सांगितल्याचे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आलेला प्रस्ताव नाकारल्यानंतर पहिल्याच दिवशी अधिवेशनात हजेरी लावून थेट नाशिकला गेले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, मी नाराज आहे. पुढे काय? ज्यांनी मला डावललं त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत, असं भुजबळ यावेळी म्हणाले. तर उद्यापासून छगन भुजबळ समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना भेटणार असून आगामी काळात आपण काय भूमिका घ्यायला हवी याबाबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता छगन भुजबळ काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.