नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आक्रमक संघटक म्हणून ते परिचित आहेत. पोलिसांकडून त्यांना यापूर्वी देखील काही गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. तीन वर्षांपूर्वी शहरातील सिडको भागात आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपूर्वी आरपीआयचे नाशिक महानगरप्रमुख प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात प्रशांत जाधव हे गंभीर जखमी झाले होते. या गोळीबार प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. आता तीन वर्षानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर यांच्या सांगण्यावरून गोळीबार झाल्याचा पोलीस तपासात उघड झाले आहे.
याबाबत सुधाकर बडगुजर यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी संवाद साधला. ते म्हणाले की, सुधाकर बडगुजर आणि दीपक बडगुजर यांचे नाव घेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांना मारहाण केली. जुने नाव घेतले त्यांची सखोल चौकशी करा. राजकीय हेतूने ही कारवाई केली जात आहे. मात्र, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही आम्हाला त्रास देण्याचे काम केले. पवननगर येथे झालेल्या गोळीबारात अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. अंबड पोलिसांच्या कामकाजावर मला संशय येत आहे असंही सुधाकर बडगुजर यावेळी म्हणाले.