जळगाव : चाळीसगाव येथे मोठ्या बहिणीसोबत आलेल्या चार भावंडांचा के. टी. वेअरच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी (ता. १८) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड (ता. चाळीसगाव) येथे घडली आहे. रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भाऊ आर्यन आर्य (वय-४) बहिणी शिवांजली आर्य (वय-६), रोशनी आर्य (वय-९) व आराध्या आर्य (वय-५) अशी मृत पावलेल्या मुलांची नवे आहेत.
नेमकं काय घडलं?
चाळीसगावपासून आठ किलोमीटरवर असलेल्या पिंपरखेडे येथील उदय सुधाकर अहिरे यांच्या शेतात सेंधवा (मध्यप्रदेश) येथील सुभानिया देवचंद आर्य हे पत्नी व पाच मुलांसह शेतात कामासाठी आले आहेत. शेतातच त्यांचे कुटुंबीयांसह राहत आहेत. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सुभानिया आर्य याची मोठी मुलगी संजना आपल्या तीन व भावाला घेऊन शेतापासून जवळच असलेल्या के. टी. वेअर बंधाऱ्यावर भांडी धुण्यासाठी गेली होती. के. टी. वेअरच्या पाणी भांडी धूत असताना चौघे भावंडं जवळच खेळत होते. संजनाने भांडी धुतल्यानंतर या चौघांना तिने घराकडे निघायला सांगितले.
दरम्यान, ताईने आवाज दिल्याने चौघे लगेच तिच्या मागे निघाले. संजना मोठी असल्याने आपल्या मागे चौघे येत आहेत, असे समजून ती पुढे निघाली. तिचा भाऊ आर्यन हा येत असताना पुन्हा मागे गेला. त्याचा पाय अचानक घसरल्याने तो के. टी. वेअरच्या पाण्यात पडला. त्याच्या मागे असलेल्या त्याच्या बहिणी शिवांजली, रोशनी व आराध्या या तिन्ही बहिणींनी त्याला पाण्यात पडल्याचे पाहताच भावाला वाचवण्यासाठी पाण्यात गेल्या.
तिन्हीही लहान असल्याने त्यांनी आपल्या परीने भावाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चौघे पाण्यात बुडाले त्यावेळी संजना थोडी पुढे चालत चालत गेली होती. आपल्या मागे येणाऱ्या भावंडांकडे तिने पाहिले तर चौघेही बंधाऱ्यातील पाण्यात बुडताना तिला दिसले. ग्रामस्थांनी चौघाही निरागस बालकांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, चौघांचाही मृत्यू झाला होता.