अहिल्यानगर : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे वधूपक्षाच्या हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी वरपक्षाच्या मित्रमंडळींनी दारू पार्टी करून हळदी समारंभात डीजेच्या तालावर नाचत यथे गदारोळ केल्याने वधूपक्ष सावधान झाला व हे लग्न मोडून टाकले. त्यामुळे बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाला घरचा रस्ता धरावा लागला आहे.
टाकळीभान येथील मुलीचा विवाह अहिल्यानगर येथील मुलाशी ठरला होता. रितीप्रमाणे लग्न समारंभाचे सर्वच सोपस्कार पार पडले. मुला-मुलीची पसंती होऊन लग्नाचा मुहूर्तही ठरला. ठरल्याप्रमाणे वरासह वरपक्षाचे जवळील नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या हौशेने हळदी समारंभाला हजर झाले. मात्र, त्या अगोदरच वरपक्षातील नातेवाईक व मित्रमंडळीने आपले गुण दाखवले. लग्नाच्या पूर्वसंध्येला हळदीच्या दिवशी कुठलाही मुलाहिजा न बाळगता नवरदेवाच्या मित्रांनी यथे दारू प्राशन केली.
दारूच्या नशेत हळदीच्या ठिकाणीच डिजेच्या तालावर जसे नाचता येईल तसे नाचत वराच्या मित्रांकडून धिंगाणा सुरू केला. हा सर्व तमाशा हताश होऊन वधूपक्षाकडील लोक बघत होते. काय करावे काही समजत नव्हते. असा व्यसनाधीन मित्र परिवार असलेल्या मुलाला मुलगी कशी द्यावी, असा एक प्रश्न वधूपक्षाकडील लोकांसमोर उभा राहिला. त्यांनी मुलगी न दिलेलीच बरी असा धाडसी निर्णय वधू पक्षाकडील मंडळीनी घेऊन वराला बोहल्यावर चढण्याअगोदरच घरचा रस्ता दाखवला.