नाशिक : सिन्नर तालुक्यातील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. कारखान्यात अचानक मोठे स्फोट झाले. झालेल्या मोठ्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसरात हादरे बसले. आगीमुळे संपूर्ण एमआयडीसी परिसरात धुराचे लोट पसरले होते.
आगीचे लोट 10 ते 15 किलोमीटरवरून दिसत आहेत. सुदैवाने कारखान्यातील 50 ते 60 कामगार सुखरूप असल्याची माहिती आहे. दुपारच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेची माहिती कळताच नगर परिषद आणि एमआयडीसीचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारच्या सुमारास लागलेली आग अजुनही शमलेली नाही.
अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून आगीवर लवकरात लवकर कसे नियंत्रण मिळवता येईल यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. आग अतिशय भीषण असल्याने, या घटनेत कारखान्याचे लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पोलीस, महसूल तसेच वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत.