नाशिक : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी हे येवला येथून मालेगावच्या दिशेने जात असताना त्यांची गाडी अडवत हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मनमाड येथे रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबेडकर अनुयायांनी काळे झेंडे दाखवून, जोरदार घोषणाबाजी करत त्यांची गाडी अडवल्याची माहिती मिळत आहे. काहींनी थेट भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून हल्लेखोरांना रोखण्यात आल्याने पुढील दुर्घटना टळली. भिडे गुरुजी मालेगावला जात असतानाच नाशिकच्या मनमाड येथे त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. संभाजी भिडे मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच अश्लील शब्दातही घोषणाबाजी केली गेली. काही तरुण आणि तरुणी थेट भिडे यांच्या गाडीसमोर येत, गाडीवर जोरजोराने हाताने मारत शिवीगाळ केली. पोलिसांनी आंदोलक तरुणांना बाजूला केल्यानंतर संभाजी भिडे धुळ्याकडे रवाना झाले. दरम्यान, काळे झेंडे दाखवणाऱ्या आणि भिडे यांच्यावर गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनमाड पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे.
संभाजी भिडे येवला येथून मालेगावच्या दिशेने जाणार असल्याची माहिती आंबेडकर अनुयायांना मिळाली. पोलीस बंदोबस्तात भिडे यांचा ताफा मनमाडमध्ये दाखल होताच आंबेडकर अनुयायांनी घोषणाबाजी करत भिडे यांचा ताफा अडवला. त्यांच्या हातात भिडे यांचे निषेध करणारे बॅनर होते. या गाडीत पुढील सीटवर भिडे बसले होते. या वेळी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करण्यात आली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. एकाने पायातील बूट काढून गाडीवर मारला. या वेळी पोलिसांकडून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी रस्ता मोकळा करून दिल्यावर भिडे गुरुजी पुढच्या प्रवासाला निघाले.