जळगाव : भाजपा रावेरमध्ये उमेदवार बदलणार अशी चर्चा होती. पण असं घडलं नाही. रावेरमधून एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे खासदार आहेत. भाजपाने पुन्हा एकदा रक्षा खडसे यांच्यावरच विश्वास दाखवलाय. रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर होताच, रावेर संदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासकरुन शरद पवार गट सक्रीय झाला आहे. महाविकास आघाडीत रावेरची जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शरदचंद्र पवार पक्ष एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. मात्र तब्येत ठीक नसल्याचं कारण एकनाथ खडसेंनी दिलं. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. शरद पवार, एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात ही चर्चा झाली. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिल्याने शरद पवार आणि एकनाथ खडसे यांच्यात बैठक झाली. महाविकास आघाडीकडून रावेर लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चा झाली. रक्षा खडसे ही एकनाथ खडसे यांच्या सून असल्याने, रावेर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार याकडे लक्ष आहे. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याबाबत देखील चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
शरदचंद्र पवार पक्ष एकनाथ खडसे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे.. मात्र तब्येत ठीक नसल्याचं कारण एकनाथ खडसेंनी दिलंय. डॉक्टरांनी परवानगी दिली तरच निवडणूक लढवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावर उपाय म्हणून एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे रोहिणी खडसे की एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना तिकीट जाहीर झाल्याने रावेर लोकसभेसाठी भाजपामधील एक इच्छुक गट नाराज झाल्याची माहिती आहे. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल सावळे यांचे तिकीट कापल्याने हा नाराजीचा सूर असल्याची माहिती आहे. रावेरच्या भालोद इथे हजारो भाजपाचे कार्यकर्ते जमा होऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली.
भाजपचा राजीनामा या ठिकाणी देत आहोत, असं पत्र समोर आलं आहे. पत्रात प्रति बावनकुळे साहेब, आज रावेर लोकसभेची जागा जाहीर झाली. अमोल जावळे यांना डावलण्यात आलं, पुन्हा अन्याय झाल्याने लोकसभा मतदारसंघात आम्ही यापुढे भाजपाचे काम करणार नाही, अशी सामूहिक स्वाक्षरी मोहीम सुरू झाली आहे, अशी माहिती प्राथमिक मिळाली आहे.