नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. चांदवड जवळील राहुड घाटात ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात नाशिक ग्रामीणचे १२ पोलीस जखमी झाल्याची माहिती. जखमी पोलिसांवर चांदवडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून पालमकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघाचा ते दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा अपघात झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. चांदवड जवळील राहुड घाटात ही मोठी दुर्घटना घडली आहे.
या अपघातात नाशिक ग्रामीण पोलिसचे १२ पोलीस जखमी झाले आहेत. जखमी पोलीस कर्मचाऱ्यांवर सध्या चांदवडच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही पोलिसांच्या डोक्याला आणि पायाला जबर मार लागल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची माहिती अद्याप समोर कळू शकलेली नाही.