नाशिक: अध्यात्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी भर पडली आहे. खरातने उभ्या केलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर आता अंमलबजावणी संचालनालयाची (ED) नजर पडली असून, या प्रकरणाला आता ‘मनी लाँड्रिंग’चे वळण मिळाले आहे. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या (SIT) सोबतीने आता ईडीचे पथक खरातच्या संपत्तीची चौकशी सुरु केली आहे.

ईडीच्या पथकाने नाशिकमधील खरातच्या साम्राज्याचे आर्थिक मोजमाप सुरू केले आहे. यामध्ये मुख्यत्वे ईशानेश्वर मंदिराच्या नावाखाली जमा झालेला अवाढव्य निधी तपासाच्या केंद्रस्थानी आहे. खरातचे मुख्य कार्यालय, गौळाणे परिसरातील जमिनी आणि विविध प्लॉट्सचे सध्याचे बाजारमूल्य तपासले जात आहे. विशेष म्हणजे, या मालमत्तांमध्ये खरातने काही गुप्त ‘भागीदार’ ठेवले होते. हा पैसा नेमका कुठून आला आणि तो पांढरा करण्यासाठी कोणत्या मार्गांचा वापर झाला, याचा शोध आता ऑडिटद्वारे घेतला जात आहे. खरातची सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून, त्यातील संशयास्पद व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, अटकेच्या सुरुवातीला पोलिसांनाच त्यांचे ‘भविष्य’ सांगण्याचा तोरा मिरवणारा अशोक खरात आता पुरता खचला आहे. स्वतःचे भविष्य अंधारात असल्याचे लक्षात आल्यावर आता खरातला लोकांसमोर जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळेच तो न्यायालयासमोर प्रत्यक्ष न जाता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ द्वारे हजर करण्याची विनंती करत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.








