अहिल्यानगर : धाराशिव जिल्ह्यातील सोनारी येथे अनोळखी महिलेचा खून झालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कौशल्याने तपास करुन अहिल्यानगर जिल्ह्यातील चौघांना अटक केली आहे. संदीप उत्तम तोरणे (वय-३४), सोमनाथ रामनाथ कराळे (वय-२७), महेश कुंडलिक जाधव (वय-१९, दोघेही रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, जि. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ३० वर्षीय महिलेचा मृतदेह सोनारी येथील शिवारात दि. १७ नोव्हेंबर रोजी आढळला होता. या महिलेच्या डाव्या हातावर ‘प्रकाश’ असे नाव गोंदले होते. तिच्या शरीरावर मारहाण केल्याच्या खुणा होता. तर तिला पुलावरुन पाण्यात फेकण्यात आले होते. या प्रकरणी रामकिसन दगडू कुंभार यांनी माहिती दिल्यानंतर अकस्मात मृत्युचा गुन्हा नोंद झाला होता. हा खुनाचा प्रकार आहे.
त्यातच कोणताच पुरावाही नसल्याने पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी यासाठी खास तपास पथक तयार केले. त्यानंतर तात्काळ पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरु केली. यात एक कार संशयास्पद असल्याचे समोर आले. त्या कारचा माग काढत पोलिस पढेगावपर्यंत (ता. श्रीरामपूर) गेले. तेथून कारचालक संदीप तोरणे याला ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्यानंतर त्याच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली. संबंधित मृत महिलेचे श्रीरामपूर येथील विश्वास नामदेव झरे याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून ती झरे याच्याकडे सातत्याने पैसे मागायची. या त्रासाला कंटाळून झरे याने तोरणे तसेच सोमनाथ कराळे, महेश जाधव यांना ९२ हजार रुपयांची सुपारी दिली.
या तिघांनी या महिलेला १६ नोव्हेंबरला रात्री तुळजापूरला देवदर्शनाला जायचे आहे, असे सांगून गाडीत घेतले. तिला नेवासा फाट्यावरुन घोडेगाव, नगर, कडा, आष्टी, जामखेड, खर्डा, आंबीमार्गे सोनारी गावाजवळील पुलावर आणले. तिथे तिचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला. हरण ओढा पुलावरुन खाली फेकून देण्यात आले. पोलिसांनी इतर तिघांनाही सोनई येथील (ता. नेवासा) वंजारवाडी शिवारातून अटक केली आहे.