नाशिक : नाशिकच्या अंबड परिसरात असलेल्या एमआयडीसीमध्ये दोन वेळा सिनेस्टाईल बँकेत प्रवेश करून स्ट्रॉंग रूम (लॉकर) फोडून चोरी केल्याची घटना घडली होती. या चोरी करणाऱ्या संशयिताला एमआयडीसी गुन्हे शोध पथकाने अटक केली असून पोलिसांनी संशयीताकडून एक लाख ६० हजार रुपयाचा मुद्दामाल जप्त केला आहे.
अमितकुमार प्रसाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. २०२३ साली अमितकुमार प्रसाद याने एमआयडीसी परिसरात असलेल्या इंडियन बँकमध्ये छत तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता १९ जुलैला त्याने पुन्हा एकदा त्याच बँकेच्या छताला भगदाड पाडून बँकेत सिनेस्टाईल प्रवेश करत लॉकर फोडून चोरी केली होती. या संदर्भात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. बँकेत चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती.
पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे या संशयीताचा शोध सुरु केला होता. त्याला अंबड परिसरातील अंबडगाव येथून अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केल्यानंतर त्याने अजूनही सात गुन्ह्याची कबुली दिली आहे.