नाशिक: नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. कोर्टाने आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.
नाशिकमधील तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली हुजेफ अब्दुल अजीज शेख याला अटक करण्यात आली.
हुजेफ अब्दुल अजीज शेख हा उच्च शिक्षित आणि अनेक खासगी कंपन्यांमध्ये भागीदार असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. आता एटीएसने शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये पथके रवाना केली आहेत.
एटीएसने आरोपीच्या घर झडतीत 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि पेन ड्राइव्ह हस्तगत केला आहे. संशयित हुजेब शेख सीरियामधील राबिया उर्फ उम ओसामा या आयसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याची एटीएसची माहिती आहे.