अहिल्यानगर : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून एक मोठी घडामोड समोर आली आहे. महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील लहू कानडे यांना उमेदवारी जाहीर झालेली असतानाही शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी आज सभा घेणार होते. मात्र, अचानक सभा रद्द झाल्याने शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांचा रक्तदान वाढला. आणि त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात महायुतीतील दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लहू कानडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी लहू कानडे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी श्रीरामपूरमध्ये सभा घेतली होती. आज भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभा घेणार होते.
मात्र, ऐनवेळी सभा रद्द झाल्याने भाऊसाहेब कांबळे यांनी टेन्शन घेतले असून काल रात्रीपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसरीकडे श्रीरामपूरला लागून असलेल्या नेवासा मतदारसंघातील उमेदवारासाठी थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभा घेणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, याबाबत बोलताना भाऊसाहेब कांबळे म्हणाले कि, जिल्ह्यातील काही नेत्यांचा माझ्यावर दबाव असून मला उमेदवारी देणारे हेच लोकं आणि मागे घ्यायला लावणारे हेच लोकं आहेत. पक्षाने मला एबी फॉर्म दिला आहे. त्यामुळे मी धनुष्यबाणाची उमेदवारी करणारच आहे. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितले असते तर मी माघार घेतली असती. सर्वसामान्य जनता माझ्यासोबत आहे. मी निवडणूक लढवणारच आहे, असं भाऊसाहेब कांबळे यावेळी म्हणाले.