जळगाव : जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील घरफोड्या करून सरपंच होण्याचे स्वप्न पाहणारा पराभूत सरपंच पदाचा उमेदवार पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या पराभूत उमेदवाराची चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रवीण पाटील हा ग्राम पंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदाचा उमेदवार होता, मात्र तो पराभूत झाला.
त्याने तब्बल वीस घरफोड्यांच्या पैशावर गाव पाटीलकीचा रुबाब दाखवत गावात पुढारी म्हणून मिरवणाऱ्या या भामट्याला पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने 20 घरफोड्यांची कबुली दिली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पदासाठी पैशांची केलेली उधळण त्याला चांगलीच महागात पडली आहे.
दरम्यान, जळगाव तालुक्यातील पाचोरा तालुक्यात घरफोडी झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास करत असताना बिलवाडी ग्राम पंचायतनिवडणूक मध्ये उमेदवार राहिलेला प्रवीण पाटील हाच घरफोडी करणारा मुख्य आरोपी असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रवीण पाटील विरोधात भक्कम पुरावे मिळविण्यात यश मिळविले होते. चोरीच्या या घटनेत त्याचा सहभाग असल्याचे निश्चित झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने आपण गेल्या पाच वर्षात तब्बल २० घरफोड्या केल्याची कबुली दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.