प्रमोद आहेर / श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदरसंघात 31 उमेदवारांपैकी पंधरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार प्रतिभा पाचपुते यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार घनश्याम शेलार यांनी आपले अर्ज मागे घेतले. आज (दि. ०४) उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख उमेदवारांसह अपक्ष आणि इतर राजकीय पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले उमेदवारांनी राजकीय तडजोड पाहून एकमेकांबरोबर केलेल्या बैठका यानंतर 31 उमेदवारांपैकी तब्बल 15 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
तर महाविकास आघाडीचे बंडखोर माजी आमदार राहुल जगताप आणि भाजपचे बंडखोर सुवर्ण पाचपुते यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्ही बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे भाजपची उमेदवारी प्रतिभा पाचपुते यांना पंधरा दिवसांपूर्वीच जाहीर झालेली होती. मागील काही दिवसापासून कुटुंबातीलच प्रतिभा पाचपुते यांच्या ऐवजी यांचे चिरंजीव विक्रम पाचपुते यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, यासाठी पाचपुते कुटुंब प्रयत्नशील होते.
प्रतिभा पाचपुते यांनी मुलगा विक्रम पाचपुते यांना उमेदवारी दिली नाही, तर आपण आपला अर्ज मागे घेणारच अशी घोषणा केलेली होती. यामुळे भाजप पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. परंतु उशिरापर्यंत पक्षश्रेष्ठींचा फोन आला नाही. तरीही प्रतिभा पाचपुते यांनी आपला अर्ज मागे घेत विक्रम पाचपुते यांचा उमेदवारी अर्ज ठेवण्यात आला.
तसेच काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम शेलार यांनी महाविकास आघाडीचे तिकीट न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारी बरोबर जोडला होता. परंतु ऐनवेळी शेलार यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
पृथ्वीराज राजेंद्र नागवडे, राजेंद्र शिवाजीराव नागवडे, पाडुरंग नारायण खेतमाळीस, पवार अनंता भुजंगराव, अरविंद बाळकृष्ण कारंजकर, निलेश संभाजी नवले, इथापे वंदना मनोज, जगताप प्रणोती राहुल, ऋषिकेश आण्णासाहेब शेलार, निवास श्रीधीर नाईक, टिळक गोपीनाथ भोस, अजित बबन भोसले, घनःश्याम प्रतापराव शेलार, निलेश नंदु गायकवाड, पाचपुते प्रतिभा बबनराव यांचा समावेश आहे.
आता 31 उमेदवारांपैकी तब्बल 15 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये शिवसेना उबाठाचे अनुराधा नागवडे, भाजपचे विक्रम पाचपुते यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत.