अहमदनगर : शिखर बँक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं क्लीनचीट दिली होती. या कथित घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
या प्रकरणाबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेत याचिका दाखल केल्याचे सांगण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे या वृत्तानंतर माध्यमांत अनेक नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या. मात्र, आता अण्णा हजारेंनीच या वृत्तावर आक्षेप घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
शिखर बँक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेत निषेध याचिका दाखल केल्याचे वृत्त माध्यमांत प्रशिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांनाच लक्ष्य केलं होतं.
मात्र, अण्णांनी क्लोजर रिपोर्ट याचिकांसदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याप्रकरणी माझा कुठलाही संबंध नसून माझ्या नावाचा दुरुपयोग करुन काही लोक स्वार्थ साधत असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं आहे. ते राळेगणसिद्धी येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
मी कधी बोलत नाही, बोललो नाही, मात्र माझं नाव आलं. मला धक्का बसला असं अण्णांनी म्हटलं आहे. तसेच, 15 वर्षांपूर्वी मी आवाज उठवला होता. पण, आता या घटनेशी माझा कुठलाही संबंध नाही. अजित पवारांना दिलेल्या क्लीन चीट संदर्भात ज्यांना माहिती आहे ते बोलतील, माझा याच्याशी कुठलाही संबंध नाही, असे स्पष्ट शब्दात अण्णा हजारे यांनी सांगितलं आहे.