नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा नाशिकच्या पाथर्डी गावात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवकावर टोळक्याकडून धारदार शस्त्राने तब्बल 25 वार करत खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
नंदेश विजय साळवे (20) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत पाथर्डी गावात घडली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी येथील इंदिरानगर पोलीस ठण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. नंदेश हा काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. यावेळी चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयते, चाकू, सुरे या धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला चढवला. या घटनेत नंदेशचा जागीच मृत्यू झाला. त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळांचा पंचनामा केला. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथक स्थापन करण्यात आली आहेत. दरम्यान, नंदेशची हत्या ही जुन्या भांडणाच्या वादातून झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.