अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे पत्नीनेच पतीच्या खुनाची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईत याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. या हत्या प्रकरणात पत्नीच सुत्रधार असल्याचे समोर आले आहे.
30 जानेवारी रोजी फिर्यादी आरती शेळकेने (26) चार अज्ञातांनी घरात प्रवेश करत पती योगेश शेळकेला गळ्यावर, हातावर, पायावर कोयत्याने वार करुन ठार केल्याचे म्हटले होते. मलाही जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही आरती शेळकेने म्हटले होते. याची फिर्याद आरतीने बेलवंडी पोलीस ठाण्यात दिली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तपाससुरू केला.
तपास सुरू असताना पोलीसांचा फिर्यादी आरतीवरचा संशय बळावला. सुरुवातीला घटनेला कुठलाही आधार नव्हता. मात्र, मयताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित लाटेचा फोन आलेला दिसून आला. लागलीच पोलीस पथकाने पुणे येथून रोहितला ताब्यात घेतले. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने फिर्यादी आरती व त्याचे अनैतिक संबंध असल्याचे कबुल केले.
या प्रकरणी आरती शेळके (वय २६), रोहित लाटे (वय २३, दोघे रा. कोथूळ, ता. श्रीगोंदा), शोएब बादशाह (वय २२, रा. सेक्टर डी लाईन, ट्रॉम्बे, मुंबई), विराज गाडे (वय १९, रा. सोलापूर बाजार, कॅम्प, पुणे), आयुष सिंह (वय १८), पृथ्वीराज साळवे (वय १९) व अनिश धडे (वय १९) यांना अटक केली आहे.