चांदवड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर रयतेसाठीचे राज्य जर कोणी केले असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. याच अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने आणि सहवासाने पावन झालेली भूमी म्हणजे चांदवड. याच चांदवड शहरात आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यात आला.
चांदवड येथे होळकरशाहीची दख्खनेतील उपराजधानी होती. या चांदवड शहरात एक टोलेजंग होळकरांचा राजवाडा तर आहेच. शिवाय मल्हारराव होळकर यांच्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ताब्यात सातमाळा पर्वत रांगेतील पाच-सहा किल्लेही होते. शिवाय महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रेणुकामातेच्या मंदिराचाही जीर्णोद्धार चांदवड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून झाला.
चांदवड येथे एक तलावही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्याकाळी केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चांदवड भूमीचा गौरवशाली इतिहास असताना सुद्धा या मातेचे एखादे स्मारक या भूमीत नसावे, हे आतापर्यंत इतिहासाच्या दृष्टीने दुर्दैवी होती. ही अनेकांच्या मनात खंत सलत होती. मात्र, शुक्रवारी (दि.15) काही इतिहासप्रेमींनी पुढे येऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा या शहराच्या मुख्य रस्त्यावर बसवण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला.