नाशिक: स्वत:ला ‘दैवी अवतार’ म्हणवून घेणाऱ्या आणि अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेले विशेष तपास पथक (SIT) खरातची कसून चौकशी करत असून, तपासात समोर येणारी माहिती कोणत्याही क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही.

अशोक खरातने केवळ धर्माचा आधार घेऊन लोकांची फसवणूक केली नाही, तर त्याने राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातही आपले जाळे विणले होते. तपासादरम्यान खरातच्या घराची झडती घेतली असता, तिथे काही बड्या नेत्यांचे फोटो आढळले. धक्कादायक म्हणजे, दोन-तीन नेत्यांच्या फोटोंवर त्याने लाल फुली (X) मारली होती, जणू काही तो त्यांच्यावर ‘करणी’ किंवा काहीतरी विधी करत होता. मात्र, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर अशी कोणतीही खूण नसल्याचे समोर आले आहे.
कारवाईचा बडगा
केवळ पोलीसच नाही, तर आता अंमलबजावणी संचालनालय (ED) देखील या प्रकरणात उतरले आहे. खरात लोकांना बनावट अधिकारी दाखवून ईडी आणि आयकर विभागाची भीती घालत असे आणि त्यातून कोट्यवधी रुपये उकळत असे. त्याच्या खात्यातील संशयास्पद व्यवहारांची आता चौकशी सुरू आहे.
15 गुन्हे अंगावर असलेल्या खरातचा आत्मविश्वास आता पूर्णपणे ढासळला आहे. चौकशीदरम्यान तो मानसिकदृष्ट्या खचलेला असून, ” माझं मरण आता इथेच जेलमध्ये आहे,” असे तो बोलत आहे. फसवणुकीचे अनेक गुन्हे त्याने कबूल केल्याचे समजते.







