अंबाजोगाई: अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. मंदार दाभाडे यांच्या आत्महत्येचं गूढ अखेर उकललं असून, एका मैत्रिणीकडून होणाऱ्या मानसिक छळाने या प्रकरणाला धक्कादायक वळण दिलं आहे. तरुणाने मृत्यूला कवटाळण्यापूर्वी आपल्या भावाला मोबाईलचा ‘पासवर्ड’ मेसेज केला होता आणि त्यातून त्याच्या आत्महत्येचे धक्कादायक कारणसमोर आले आहे.

डॉ. मंदार यांनी 6 एप्रिल रोजी पहाटे गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सुसाईड नोट सापडत नसल्याने सुरुवातीला तणावाखालील आत्महत्या केल्याच वाटत होतं. मात्र, मंदार आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलचा पासवर्ड भावाला पाठवला होता. भावाने डेटा तपासला, तेव्हा त्यात एक डिजिटल सुसाईड नोट आढळली. या नोटमध्ये ‘स्नेहल पाटील’ नावाच्या तरुणीचा उल्लेख असून ती मंदारला सतत ब्लॅकमेल करत असल्याचं समोर आलं आहे.
तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, स्नेहल आणि मंदार यांची मैत्री होती. मात्र, तरुणी मंदारला ब्लॅकमेल करत होती. बदनामीच्या भीतीपोटी मंदार कमालीच्या तणावात होते. स्नेहल नेमक्या कोणत्या कारणासाठी ब्लॅकमेल करत होती, हे चॅट्स आणि कॉल रेकॉर्ड्सवरून स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी स्नेहल पाटील विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.







