अहमदनगर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आव्हान देत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषण सुरू केलं आहे. वडगोद्री येथे हाकेंनी उपोषण सुरू केल्यामुळे जालना जिल्ह्यात ओबीसी आणि मराठा समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
असं असताना मराठा समाजाने जालना जिल्हा बंदची हाक दिली आहे. त्यानंतर परभणी आणि पुणे जिल्ह्यातही मराठा समाजाने बंदची हाक दिली आहे. एवढच नाही तर आता मराठा समाजाकडून अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून उद्या अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अहमदनगर तहसील कार्यालयासमोर गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षण तसेच इतर विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून, त्याच पार्श्वभूमीवर उद्या विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 20 जुलैपासून पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी उपोषण सुरू केलं आहे. सोमवारी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता.
तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला, पण मराठा आरक्षणावर ते काहीही बोलले नाहीत. त्यावरुन त्यांनी शाह यांच्यावर देखील टीका केली होती. तर, पुढचं उपोषण हे येवल्यात येऊन सुरू करेल, असा इशारा मंत्री छगन भुजबळ यांना जरांगे यांनी दिला आहे. मात्र, उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली असून जालन्यातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक त्यांच्या सेवेसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.